Tuesday, May 5, 2009

साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥ १ ॥

कापुराची वाती उजळली ज्योती । ठायींच समाप्ती झाली जैसी ॥ २ ॥

मोक्षरेखें आला भाग्ये विनटला । साधूचा अंकिला हरिभक्त ॥ ३ ॥

ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्त्वीं ॥ ४ ॥


साधनचतुष्टय अधिकाऱ्यास श्रीगुरुरूपी साधूनी 'तत्त्वमसि' ह्या वाक्याचा बोध केल्यावर देहेंद्रियातीत मी ब्रह्म आहे असा अनुभव होतो, पण तोही अनुभव स्फुरणरहित ज्ञानरूप ब्रह्मामध्यें नाहीसा होतो, मग तो अधिकारी देहबुद्धीनें, अथवा देहातीत जीवबुद्धीने, अथवा जीवातीत शिवबुद्धीनेही न उरून अवशेष ज्ञानाज्ञानातीत सहज निर्धर्म ब्रह्मस्थितीनें असतो. ॥ १ ॥ जसें कापूररूपी वात अग्नीच्या ज्योतीनें पेटली म्हणजे कापूर व अग्नि ह्यापैकीं कांही एक शिल्लक रहात नाही. ॥ २ ॥ त्याप्रमाणें साधूंच्या अंकित झालेल्या हरिभक्ताची, विद्या अविद्येची निवृत्ति होऊन नित्य निर्धर्म मोक्ष भूमिकेवर प्राप्त होऊन तो परम ऐश्वर्यरूप मोक्षानें सुशोभित होतो. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला साधुसंतांच्या संगतीत असण्यांत गोडी वाटते आणि मला सर्व जनात व वनात आत्मतत्त्वरूप हरि दिसत आहे ॥ ४ ॥

No comments:

Post a Comment