३
त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥ १ ॥
सगुण निर्गुण गुणांचें अगुण । हरिविणें मत व्यर्थ जाय ॥ २ ॥
अव्यक्त निराकार राहीं ज्या आकार । जेथुनी चराचर त्यासी भजें ॥ ३ ॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामक्इश्ह्ण मनीं । अनंत जन्मांनीं पुण्य होय ॥ ४ ॥
त्रिगुणात्मक जगत् अशाश्वत व असार आहे. तीन गुणांचे पलिकडे असलेलें निर्गुण निराकार परब्रह्म तेंच शास्वत व सार होय. ह्या सारासाराचें रहस्य निरंतर हरिचिंतनांत रत असणें हेंच होय. ॥ १ ॥ जे गुणसहित साकार आहे तें सगुण, जें गुणरहित निराकार आहे तें निर्गुण. म्हणजे सगुण तेंच निर्गुण व निर्गुण तेंच सगुण - फक्त गुण तेवढे अधिक वा उणे. कारण हरीची व्याप्ति दोहीतही समानत्वेंकरून आहे. त्या दृष्टीनें कोणत्याही सगुण वस्तुस निर्गुण असें निश्चयानें म्हणण्यास कांही हरकत नाहीं. श्रीहरीच्या ठिकाणी आकार अगर दुसरी कोणतीही उपाधि नसल्यामुळें त्याच्या स्वरोपाचें ज्ञान नेत्रादिक जड इंद्रियांस होणें शक्य नाही, ह्यासाठी भगवत देहाची मीमांसा करीत न बसतां, भगवत चिंतन करण्यांतच गढून जा. त्यावांचून अन्य विषयांत जर तूं आपलें मन गुंतविशील तर तो त्या मनाचा दुरुपयोग झाला असें समज. ॥ २ ॥ जे व्यक्त नसून अमूर्त आहे, ज्यास आकार नाही, व ज्याच्यापासून चर (चेतनयुक्त) व अचर (जड) अशा उभयभावात्मक जगताची उत्पत्ति झाली, त्या हरीचें तूं भजन कर. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ध्यानांत व मनांत निरंतर रामकृष्ण आहे व त्यायोगानें या जन्मात अनंत पुण्याईची जोड आहे. ॥ ४ ॥

No comments:
Post a Comment