Tuesday, May 5, 2009

योग याग विधी येणें नोहे सिद्धि । वायांचि उपाधि दंभधर्म ॥ १ ॥

भावेंवीण देव न कळे निःसंदेह । गुरुवीण अनुभव कैसा कळे ॥ २ ॥

तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजेवीण हित कोण सांगे ॥ ३ ॥

ज्ञानदेव मार्ग द्‍इश्ह्टांताची मात । साधूचे संगती तरुणोपाय ॥ ४ ॥


अष्टांगयोग व यज्ञ याचें यथाविधि आचरण केल्यानें हरीची प्राप्ति होणार नाही. कारण ही सर्व हरि प्राप्तीविषयी बहिरंगे - दूरची साधनें - आहेत. याचें अनिष्ठान करणारामध्यें मी मोठा योगी आहे, याज्ञिक आहे, माझी सर्वत्र ख्याति व्हावी अशी वासना उत्पन्न होते व ती वासना पूर्ण होण्याचे इच्छेनें तो योग, यज्ञ वगैरे करतो व त्यामुळें खरा धर्म न होऊन पीडा करणारा व्यर्थ दांभिकधर्म मात्र होतो. ॥ १ ॥ भावावाचून साधकास देव केव्हांही निःसंशय कळावयाचा नाही, म्हणजे देववचन, गुरुवचन, याच्यावर दृढ विश्वास असल्यावांचून देवाचें निःसंशय ज्ञान होणार नाही. कारण देवस्वरूपाचा जो अनुभव होतो तो गुरूंनी केलेल्या महावाक्योपदेशानेंच होतो; आजपर्यंत सर्वांना देवाचा अनुभव गुरूचेच द्वारानें मिळालेला आहे, म्हणून त्यावांचून देवाचा अनुभव कसा कळेल ? ॥ २ ॥ तपावांचून देव प्रसन्न होणार नाही व दिल्यावांचून कांही मिळणार नाही, म्हणजे कर्म करावें तसें फळ मिळतें. हित सांगणारांमध्यें जर गूढ आत्मज्ञान (गुज) नसेल, तर तो काय सांगेल ? कारण आत्मज्ञान होणें हेंच सर्वांचे हित आहे. गुजचा एक अर्थ प्रेम असाही होतो. हित सांगणारांमध्यें जर प्रेम नसेल, तर तो काय जे सांगेल ते कोरडेच. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व जीवांना संसारातून तारण्याचा उपाय, साधूची संगत करणें हाच होय असें माझ्या अनुभवावरून मी जाहीर करतो. ॥ ४ ॥

No comments:

Post a Comment