२४
जप तप कर्म क्रिया नेम धर्म । सर्वांघटीं राम भाव शुद्ध ॥ १ ॥
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो । रामक्इश्ह्ण टाहो नित्य फोडी ॥ २ ॥
जाति वित्त गोत्र कुळ शीळ मात । भजकां त्वरित भावनायुक्त ॥ ३ ॥
ज्ञानदेव ध्यानीं रामक्इश्ह्ण मनीं । वैकुंठभुवनीं घर केलें ॥ ४ ॥
जपतपादि कर्मे व अनेक नियमधर्म ज्या भावनेनें करतो त्या भावनेपेक्षां सर्व देहामध्यें एक आत्मारामालाच पाहणें ही भावना शुद्ध आहे. दुसरा अर्थ :- जप, तप, कर्म, क्रिया, नेम धर्म इत्यादि साधनें सर्व भूतांचे ठिकाणी अभिन्नत्वेंकरून परमात्मरूपाला पाहणें, या शुद्ध भावनेच्या पायावर उभारली गेली पाहिजेत. ॥ १ ॥ म्हणून अशा शुद्ध भावाचा त्याग करूं नको. या भावामध्यें बिघाड आणणाऱ्या सर्व संशयास फेकून दे, आणि रामकृष्ण नामाचा सारखा टाहो फोडीत रहा. दुसरा अर्थ :- अशा प्रकारचा शुद्ध भाव त्या साधनादिकेंकरून साध्य आहे, तरी त्या साधनानुष्ठानाचे भरात या साध्या गोष्टीकडे दुर्लक्ष होता कामा नये. सर्व संशय टाकून हा शुद्ध भाव वृद्धिंगत होण्याकरितां जीवानें रामकृष्णाचा निरंतर टाहो फोडला पाहिजे. ॥ २ ॥ जातीच्या, पैशाच्या, गोताच्या, कुळस्वभावादि गोष्टीच्या भानगडीत पडूं नको. शुद्ध भावनेनें युक्त होऊन त्वरेनें हरीला जप. दुसरा अर्थ :- या शुद्ध भावनेनें त्वरित युक्त होऊन जातीला, पैशाला व कुळगोत्रजाना तूं भज, म्हणजे जातीस, गोतास, कुळशीलास योग्य अशी कर्में कर, व द्रव्यार्जन, संगोपनादि व्यवहार मोठ्या दक्षतेनें कर म्हणजे अशा करण्यानें प्रापंचिक बाधा होणार नाही. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ध्यानात मनात नेहमी रामकृष्णाची वस्ती आहे, त्यामुळें वैकुंठलोकीं माझें घर झालें आहे. दुसरा अर्थ :- श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमचें घर वैकुंठभुवनांत झालें आहे, म्हणजे वैकुंठरूप हरीचें ठिकाणी आमची वस्ती झाली आहे ॥ ४ ॥

No comments:
Post a Comment