Tuesday, May 5, 2009

१०

त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थें भ्रमीं । चित्त नाहीं नामीं तरी ते व्यर्थ ॥ १ ॥

नामासी विन्मुख तो नर पापिया । हरीविण धांवया न पावे कोणी ॥ २ ॥

पुराणप्रसिद्ध बोलिले वाल्मिक । नामें तिन्ही लोक उद्धरती ॥ ३ ॥

ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचें । परंपरा त्याचें कुळ शुद्ध ॥ ४ ॥



हरीच्या नामाकडे चित्त नाहीं आणि गंगा यमुना, सरस्वती या तीन नद्यांचा संगम जो प्रयाग त्या प्रयागास जातो, अथवा दुसऱ्या अनेक तीर्थयात्रा करतो, तर त्याचें ते करणें व्यर्थ होय. ॥ १ ॥ जो हरीच्या नामाविषयी विन्मुख आहे, म्हणजे तें नाम कधीही घेत नाही, तो मनुष्य पापी होय. त्याला पापातून सोडविण्यास हरीवांचून दुसरा कोण धांव घेणारा आहे ? ॥ २ ॥ भगवंताच्या नामानें पातकांपासून त्रैलोक्याचा उद्धार होतो असें वाल्मीकीने रामायणांत सांगितलें आहे. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामाचें जो भजन करतो त्याच्या सर्व वंशाचा उद्धार होतो. ॥ ४ ॥

No comments:

Post a Comment