४
भावेंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति । बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥ १ ॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥ २ ॥
सायासें करिसी प्रपझ्ण्च दिननिशीं । हरिसी न भजसी कोण्या गुणे ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥ ४ ॥
जन्ममृत्युरूप संसारदुःखापासून एक हरीच सोडविणारा आहे, असा दृढ विश्वास असल्यावांचून हरीवर आत्यंतिक म्हणजे निःसीम प्रेम बसणार नाही, व अशा निःसीम भक्तीवांचून संसारांतून मुक्तता केव्हांही होणार नाही असा नियम आहे. ह्यास्तव हरीच्या ठिकाणीं भाव असल्यावांचून भक्ति होईल व भक्तीवांचून मुक्ति मिळेल असें जे म्हणतात त्यांचे तें म्हणणें आपल्या अंगांत कांही एक बळ नसतांना मी अमूक एक शक्तीची गोष्ट करीन असें म्हणण्याप्रमाणें व्यर्थ होय, म्हणून तसें बोलूं नये ॥ १ ॥ देव लवकर कशानें प्रसन्न होईल असा जर तुझा प्रश्न असेल तर कांहीएक व्यर्थ शीण न करतां आपल्या चित्तास विषयवासनेच्या ओढाताणीतून सोडवून स्थीर कर आणि निजबोधानें शांत रहा ॥ २ ॥ देह, पुत्र, स्त्री, गृह, धन इत्यादिकांच्या प्राप्तीविषयीं व रक्षणाविषयीं प्रापंचिक खटाटोप तूं रात्रंदिवस करीत आहेस, व हरीचें भजन मात्र मुळींच करीत नाहीस तें कां बरें ? ॥ ३ ॥ हरीचें भजन कर म्हणजे तूं या संसारसागरांतून तात्काळ तरून जाशील, असें श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ॥ ४ ॥

No comments:
Post a Comment