१
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणें । द्वारकेचा राणा पांडवां घरीं ॥ ४ ॥
देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहिल्यानें सलोकतादि चारी मुक्तींचा लाभ होतो. हे सकृद्दर्शनी असंभाव्य वाटतें, परंतु द्वारीं उभे असणें म्हणजे 'सेवकाच्या नात्यानें तत्पर असणे' असा अर्थ घेतला पाहिजे. श्रीतुकोबारायांनी (सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेद काम सांडोनिया ॥ ) परमप्रितीनें भगवन्नामोच्चार करणें हीच हरीची सेवा आहे असे सांगितलें आहे. श्रीज्ञानेश्वर महाराजांनीही पुढील ध्रुवपदांत 'हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा' असेंद्विरुक्तीनें सांगण्यांत हरीचे नामस्मरण हेंच देवाचें द्वार असे सुचविले आहे. 'क्ष्णभर या पदाचा अर्थ 'अति अल्पकाल' असा घ्यावा. अत्यल्पकाल देखील हरिनामोच्चररूप सेवा केली असतां चारी मुक्तीचा लाभ होतो, अस पहिल्या कडव्याचा सरळ अर्थ आहे. देवाचें मुख्य द्वार म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानरूपी द्वाराचा क्षणभरही आश्रय करण्यात मुक्तता आहे; म्हणजे बाह्य पंचविषयांपासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनात्मा जड आहेत, असे विचाराने जाणून त्याचें तादात्म्य सोडणें व अंतर्मुख वृत्तीनें नित्य ज्ञानरूप आत्माकार क्षणभर वृत्ति करणें म्हणजेच मोक्ष. पण अशा सिद्धांताने हरीचे नाम हेंच देवाचें द्वार सुचविलें त्यास व्यर्थत्व येते अशी कोणी शंका घेईल, तर हरिनामस्मरण केल्यावांचून चित्तशुद्धि होणार नाही, व चित्तशुद्धि झाल्यावाचून आत्मविषयक वृत्तीचीही उत्पत्ती होणार नाही. म्हणून हरिनामस्मरणाच्या आश्रयानेंच मुख्य ज्ञानद्वाराचा लाभ होतो. "क्षणभर" ह्याचा लाक्षणिक अर्थ घेतला, तर अनंत जन्मजन्मांतरीच्या दृष्टीने आपले आयुष क्षण समानच आहे. अशा दृष्टीनें क्षणभर म्हणजे जन्मभर असा अर्थ घ्यावा. म्हणून जन्मभर हरिनामस्मरणाचा आश्रय करणारा जो साधक त्याला चारी मुक्तीचा लाभ होतो. ॥ १ ॥ (हरिनामोच्चार करण्यात रत राहण्याविषयीं ध्रुवपदांत मोठ्या अट्टाहासानें सकळ जनांस बोध करीत आहेत) मुखानें 'हरिनाम घ्या हरिनाम घ्या' असे द्विवार सांगून त्यापासून अगणित पुण्याचा लाभ होईल असें सांगतात ॥ २ ॥ देह-स्त्री-पुत्र-गृह रूपी संसारात राहूनही जिव्हेला हरिनामाचें प्रखर व्यसन लावून घ्या असे वेदशास्त्रादिक हात उंचावून सांगत आहेत ॥ ३ ॥ श्रीमहाराज म्हणतात की, अशा प्रकारचे व्यसन पांडवांनी लावून घेतल्यामुळे त्यांच्या घरी द्वारकाधीश श्रीकृष्णपरमात्मा कसा राबत होता हें श्रीमत् व्यासकृत महाभारतावरून दिसूने येईल. ॥ ४ ॥

No comments:
Post a Comment