Tuesday, May 5, 2009

१५

एक नाम हरि द्वैतनाम दूरी । अद्वैत कुसरी विरळा जाणे ॥ १ ॥

समबुद्धि घेतां समान श्रीहरी । शमदमां वरी हरि झाला ॥ २ ॥

सर्वांघटी राम देहादेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥ ३ ॥

ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥ ४ ॥



जो एका हरीचेंच नाम जाणतो, दुसरें (द्वैताचें) नाम ज्यापासून दुरावलें गेलें आहे, म्हणजे दुसऱ्या नांवाची ज्याला ओळखच नाहीं, जो सकळ सृष्टि हरिरूप पाहून हरिनामच सकळ सृष्टपदार्थात ओळखतो, असा एखादाच असतो. ॥ १ ॥ जीव ईश, जीव जड, ईश जड, जीव जीव, आणि जड जड असे बुद्धींतील पांच प्रकारचें भेद विचारानें नाहीसे करून समबुद्धीनें भेदशून्य श्रीहरीचें जो ग्रहण करतो, तो शमदमाचा वैरी म्हणजे साधकाला शमदमाच्याही बंधनातून सोडविणारा जो हरि तद्रूप होतो. 'शमदमावरी' असा पाठ घेतला तर दुसरा अर्थ असा होतो :- शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे बाह्येंद्रियनिग्रह, ते करून वर सांगितलेल्या पाच प्रकारच्या भेदवैषम्याच्या बुद्धींतून निरास करून समबुद्धीनें सर्व ठिकाणी समान हरीचें जो ग्रहण करतो तो स्वतः हरि होतो. ॥ २ ॥ सर्व देहामध्यें एकच व्यापक राम आहे. पहा, हजार किरणांतून तेजोरूपी एक सूर्यच भरलेला असतो, म्हणजे त्या हजार किरणांचा प्रकाशक एक सूर्यच असतो. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी आपले चित्तामध्यें सर्वकाळ हरीचेंच चिंतन करण्याचा नियम केला आहे. त्या योगानें मागील (या जन्माचे, मागाहून येणारे, पुढचे) जन्म यापासून मी सुटलों. आतां मला पुन्हा जन्म नाही. ॥ ४ ॥

No comments:

Post a Comment