१२
तीर्थ व्रत नेम भावेवीण सिद्धी । वायांची उपाधी करिसी जनां ॥ १ ॥
भावबळें आकळे येरवी नाकळे । करतळीं आंवळे तैसा हरी ॥ २ ॥
पारियाचा रवा घेतां भूमीवरी । यत्न परोपरी साधन तैसें ॥ ३ ॥
ज्ञानदेव म्हणे निव्इत्ति निर्गुण । दिधलें संपूर्ण माझे हातीं ॥ ४ ॥
अहो जनहो, कितीही तीर्थयात्रा केल्या व अनेक व्रतनियमाचें आचरण केलें, तरी हरीवर दृढ विश्वास असल्यावाचून ती सफळ होणार नाहीत, याकरिता तुम्ही हा व्यर्थ शीण कां करतां ? ॥ १ ॥ हरीच्या ठिकाणीं विश्वास ठेवून त्यचें भजन केल्यानें तो परमात्मा तळहातावरील आवळ्याप्रमाणें आपल्या हस्तगत होतो, अन्य उपायांनी तो हस्तगत होणार नाही. ॥ २ ॥ पारा जमिनीवर पडून त्याच्या बारीक बारीक गोळ्या जमिनीवर पिसकरल्या म्हणजे ज्याप्रमाणें ते पाऱ्याचे सर्व कण एके ठिकाणी जमवून हातात घेण्याला पुष्कळ प्रयास पडतात, त्याप्रमाणें हरिनामावांचून इतर साधनांनी भगवत्प्राप्ति होण्याला पुष्कळ कष्ट सोसावे लागतात. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की, माझे गुरु निवृत्तिनाथ हे गुणत्रयापलीकडील निर्गुण आहेत त्यांनी हरिस्वरूपाचा पूर्ण बोध माझा हातामध्यें दिला, म्हणजे त्यांनी केलेल्या बोधानें माझ्या बुद्धीस पूर्ण अनुभव झाला. ॥ ४ ॥

No comments:
Post a Comment