Tuesday, May 5, 2009

१३

समाधि हरीची सम सुखेंवीण । न साधेल जाण द्वैतबुद्धि ॥ १ ॥

बुद्धीचें वैभव अन्य नाहीं दुजें । एका केशवराजे सकळ सिद्धि ॥ २ ॥

‍इद्धि सिद्धि अन्य निधि अवघीच उपाधी । जंव त्या परमानंदी मन नाहीं ॥ ३ ॥

ज्ञानदेवीं रम्य रमलें समाधान । हरीचें चिंतन सर्वकाळ ॥ ४ ॥



सृष्टींतील लहान मोठे वगैरे भेदरूपी वैषम्य विचारानें काढून शिवापासून तृणापर्यंत एकरूपानें वास्तव्य करणाऱ्या हरीचें समबुद्धीनें ग्रहण केलें असता समाधि (आत्मस्थिति) प्राप्त होते. जर बुद्धींतील सजातियादि भेद गेले नसतील तर भेदात्मक बुद्धीस हरीची समाधि कधींही प्राप्त होणार नाहीं . ॥ १ ॥ केशवास (आत्म्यास) यथार्थत्वेंकरून जाणणें हेंच बुद्धीचें ऐश्वर्य आहे, यावांचून दुसरें नाही. त्यानेंच जगातील सर्व सिद्धींचा लाभ होतो. ॥ २ ॥ ऋद्धि म्हणजे ऐश्वर्य, सिद्धि म्हणजे अणिमा गरिमा इत्यादि अष्ट प्रकारच्या सिद्धि, यांचा निधि म्हणजे ठेवा प्राप्त झाला, तरी जोपर्यंत परमानंदरूप हरीच्या ठिकाणीं मन नाही, तोपर्यंत त्या पीडादायकच आहेत. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्राणिमात्राला रमविणारें असें समाधान माझे ठिकाणीं सुस्थिर झालें असून हरीचें चिंतन सर्वकाळ चालले आहे. ॥ ४ ॥

No comments:

Post a Comment