Tuesday, May 5, 2009

संतांचे संगती मनोमार्गगती । आकळावा श्रीपति येणें पंथें ॥ १ ॥

रामक्‍इश्ह्ण वाचा भाव हा जीवाचा । आत्मा जो शिवाचा राम जप ॥ २ ॥

एकतत्त्वी नाम साधिती साधन । द्वैताचें बंधन न बाधिजे ॥ ३ ॥

नामाम्‍इत गोडी वैश्ह्णवां लाधली । योगियां साधली जीवनकळा ॥ ४ ॥

सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला । उद्धवा लाधला क्‍इश्ह्णदाता ॥ ५ ॥

ज्ञानदेव म्हणे नाम हें सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ॥ ६ ॥


आपल्या मनोवृत्तीची धाव संताच्या संगतीकडे लाव, व या साधनानें तूं लक्ष्मीपतीस वश करून घे, म्हणजे संत ज्याप्रमाणें सांगतील त्याप्रमाणें ती गोष्ट मनावर धरून देहानें मनानें तसें वाग. हरीला वश करून घेण्याचें साधन हेंच होय ॥ १ ॥ वाचेने निरंतर रामकृष्णाचा जप करणें हाच जीवाचा धर्म होय. म्हणून मायोपाधिक शिवाचा आत्मा जो राम त्याचें तू भजन कर; अथवा रामजप हाच शिवाचाही आत्मा आहे. अर्थात् जीवानें त्याचें भजन करणें अवश्यच आहे. ॥ २ ॥ एकतत्त्व हरि, त्यास त्याच्या नामरूपी साधनानें जे कोणी प्राप्त करून घेतात, त्यांस मी आणि तूं इत्यादिक द्वैतबंधनाची बाधा होत नाही. ॥ ३ ॥ योग्यांना सतराव्या जीवनकलेच्या प्राप्तीमध्यें जें सुख व जी आवड आहे, तेंच सुख व तीच आवड वैष्णवांना हरीचे नामामृत सेवनामध्यें आहे. ॥ ४ ॥ बाळपणींच प्रऱ्हादाचे जिव्हेवर हरीच्या नामाचा उच्चार ठसला व कृष्णासारखा उदार ज्ञानदाता उद्धवाला मिळाला. ॥ ५ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीचें नाम सर्व पारमार्थिक साधनात सोपें असून तें सर्व मनुष्यांना दुर्मिळ झालें आहे, कारण हरीचें नाम कोणी घेत नाही. त्याची सुलभता व योग्यता जाणून तें नाम सदोदित घेणारा असा पुरुष विरळा आहे. ॥ ६ ॥

No comments:

Post a Comment