२
चहूं वेदीं जाण साहिशास्त्रीं कारण । अठराहीं पुराणें हरीसी गाती ॥ १ ॥
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ २ ॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां दुर्गमी न घालीं मन ॥ ३ ॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥ ४ ॥
चार वेद, सहा शास्त्रें व अठरा पुराणें ही हरीचेंच वर्णन करीत आहेत. ॥ १ ॥ ज्याप्रमाणें दही घुसळून त्यांतील सारभूत लोणी काढून घेतात व असार ताकाचा त्याग करतात, त्याप्रमाणें चार वेद, सहा शास्त्रें व अठरा पुराणें ह्यामध्यें सारभूत असणाऱ्या हरीचें तूं विचारानें ग्रहण कर, आणि त्यांतील ताकाप्रमाणें असणाऱ्या वांझट कथांचा मार्ग टाकून दे ॥ २ ॥ हरि जो एक आत्मा त्याची व्याप्ति मायोपाधिक शिवामध्यें व अविद्योपासक जीवामध्यें एकसारखीच आहे. त्या हरीला सोडून दुसऱ्या समजण्यास कठीण अशा साधनांमध्यें तूं आपलें मन घालूं नको. (भज गोविंदम् भज गोविंदम भज गोविंदम् मूढ मते ? ) ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरि म्हणजेच वैकुंठ. हरि हे त्या वैकुंठाचें नांव आहे. त्याचेंच मी निरंतर भजन करतों आणि तो मला पाण्यानें भरलेल्या मेघाच्या दाट फळीप्रमाणें जिकडे तिकडे दिसत आहे. ॥ ४ ॥

No comments:
Post a Comment