२७
सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी । रिकामा अर्धघडी राहूं नको ॥ १ ॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार । वायां येरझार हरीविण ॥ २ ॥
नाममंत्र जप कोटी जा{ई}ल पाप । रामक्इश्ह्णीं संकल्प धरूनी राहे ॥ ३ ॥
निजव्इत्ति हे काढी माया तोडी । इंद्रियांसवडी लपूं नको ॥ ४ ॥
तीर्थीं व्रतीं भाव धरीं रे करुणा । शांति दया पाहुणा हरि करीं ॥ ५ ॥
साही शास्त्रांनी हरीच्या नामांत सर्व सुखमाधुर्य आहे असें निवडून ठवविलें आहे. (देह हा सादर पहावा निश्चित । सर्व सुख येथें नाम आहे) त्याचें नेहमीं तूं सेवन कर, अर्ध घटका देखील रिकामा राहूं नको. ॥ १ ॥ कारण देहादिक संसार व त्यातील व्यवहार सर्व खोटा आहे, म्हणून हरीला सोडून या संसाराच्या मोहांत राहशील तर तुझी जन्म-मरणाची येरझार व्यर्थ होईल. ॥ २ ॥ म्हणून हरिनाममंत्राचा तूं निरंतर जप करीत जा, या योगानें तुझ्या अनंत पापांचा नाश होईल, याकरितां रामकृष्णनाम घेण्याविषयींचा निश्चय तूं आपल्या मनाशी पक्का करून रहा. ॥ ३ ॥ गुरूजवळ श्रवण, मनन व निदिध्यासनाचा अभ्यास करून तिन्ही देहांतून व तिन्ही गुणाहून वेगळा जो आत्मा तो मी आहे अशी वृत्ति उत्पन्न कर व त्या योगानें सर्व मायाजाळाचा नाश कर. इंद्रियांच्या तादात्म्यात लपून बसू नको. ॥ ४ ॥ तीर्थव्रतांच्या ठिकाणी तू विश्वास ठेव व नेहमीं दया बाळग; कारण जेथें शांति दया असतात तेथें देवाची वस्ती असते, म्हणून तूं आपल्या हृदयांत शांति दया ठेवून तेथें श्रीहरि वस्तीला येईल असें कर. ॥ ५ ॥ हरिपाठ हा समाधीसंजीवन आहे, म्हणजे त्यास जिवंत करणारा आहे, अर्थात् हरिनामाचे ठिकाणी स्थिर होणें, हेच आत्मस्वरूपाचे ठिकाणी जागृत असणें होय, कारण हरिनाम व नामी परमात्मा हा दोन्हींचा अभेद आहे.
परी आश्रय आकाशा । आकाशचि कां जैसा ।
या नामा नामी आश्रय तैसा । अभेद असे ॥ ज्ञानेश्वरी १७.४०३
ज्याप्रमाणें आकाशाला आश्रय आकाशाचा आहे, त्याप्रमाणें नामाला आश्रय तो नामी परमात्मा असल्यामुळें त्या परस्परात अभेदच आहे. म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृत असणें हेंच खरे जिवंत असणें होय. असले जिवंतपण हरिनामाच्या ठिकाणी स्थिर असलें म्हणजे मिळतें. असें ज्ञान मला श्रीनिवृत्तिनाथापासून मिळालें व मला अनुभवानें ते खरें आहे असें पूर्ण कळले, असे श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात.